Manache Shlok With Marathi Meaning(मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ)
|| जय जय रघुवीर समर्थ ||
सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
- अर्थ
समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये आपल्या मनाला समजावून सांगताना दिसतात. प्रभू श्रीराम हे समर्थ रामदास स्वामींचे उपास्य दैवत होते. समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला समजून सांगतात की, हे मना प्रभू श्रीराम सदैव आपल्या जवळच आहेत, ते जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र वास करतात, या सर्व स्रुष्टीमध्ये माझा परमेश्वर हा व्यापलेला आहे, सृष्टीच्या प्रत्येक कानामध्ये त्याचा वास आहे. आपल्या आतला अंतरात्मा हे त्याचंच एक रूप आहे. आपण देहबुद्धी मध्ये राहून जे काही कर्म करत असतो त्याचा तो एकमेव साक्षी आहे. हे मना या कली काळाच्या मगरमिठी मध्ये अनेक विषय समोर येतील. त्या विषयांच्या आहारी जाऊन दुष्कर्म करू नकोस. प्रभू श्रीराम या अवस्थेतील आपलं धारिष्ट पाहत आहेत. . त्यांची भक्ती केली तर सुख आणि आनंद याचाच लाभ आपल्याला होईल. तेव्हा हे मना तू त्या प्रभू श्रीरामाची म्हणजेच परमेश्वराची दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून भक्ती कर.
प्रभू श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत.संकट आलं की आपण आपल्या परमेश्वराला दोष देतो परंतु स्वतःचं कर्म कधीच पाहत नाही. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे मागील जन्मात आपण केलेल्या पाप-पुण्याचा निवडा. मागील जन्मातील कर्म या जन्मामध्ये प्रारब्धाच्या स्वरूपात उभे राहते. मागच्या जन्मी काही चुकीचं कर्म घडले असेल तर त्याची फलश्रुती या जन्मात संकटाच्या रूपात भोगावयास येते. असे संकट आले की आपण लगेच देवाला दोष देऊन मोकळे होतो. हीच एक रजोगुणाचे भूमिका आहे. आपण म्हणतो की हे परमेश्वरा मी तुझी एवढी भक्ती करतो,कोणतेही वाईट कर्म करत नाही तरी माझ्याच वाट्याला असे संकट का?
खरे तर आपला विश्वासच या ठिकाणी कमी पडतो. परमेश्वर आपल्या भक्तांना कधीच दूर ठेवत नाही. तो तर भक्तीचा भुकेला असतो. आपल्या भक्तांना तो कधीच संकटात एकटे सोडत नाही. मागील कर्माचे भोग हे भोगावेच लागतात त्यातून खुद्द देव देवता सुद्धा वाचले नाहीत. अशावेळी ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो तोच आपल्या सोबत असतो. जो आपल्याला हे भोगण्याची सामर्थ्य पुरवत असतो, मोठ्या संकटाची तीव्रता कमी करून आपल्यासमोर आणत असतो. पण आपण मात्र रजोगुणतले! परमेश्वरा वरचा विश्वास कमी करून बसतो. केलेली सर्व भक्ती निष्फळ ठरते. पण तरीही तो कर्ता-करविता आपल्याला दूर लोटत नाही. आपल्याला जवळच करतो. त्याच्यावर ती दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून भक्ती केली तरच सुख आणि आनंद प्राप्त होईल.
हीच गोष्ट समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू,एक राम नावाचा तरुण मुलगा होता, जो गणपतीचा निस्सीम भक्त होता. रोजच्या रोज सकाळी उठून गणपतीची पूजा करायचा, गणपती स्तोत्राचे पठण श्लोकांचे पठण करायचा. असा हा राम कधीच कसलाच वाईट विचार करत नसायचा, समाज सेवेत तो गुंतलेला असायचा. त्याच्याकडे एक दुचाकी होती. त्याला दुचाकीवरून सवारी करणं फार आवडायचं. दुचाकीवरून फिरताना त्याचा वेग नेहमीच जास्त असायचा. कॉलेजपासून त्याचं घर सुमारे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर होते. हेल्मेट असून सुद्धा हेल्मेटचा वापर करत नसे. तो मंगळवारचा दिवस होता. सकाळी नेहमी प्रमाणे गणपतीची उपासना करून, नाश्ता करून, कॉलेजला जाण्याच्या तयारीला लागला, उशीर झाल्या कारणाने तो फार घाई गडबडीत होता, त्यादिवशी हेल्मेट घालून दुचाकीवरून फार वेगाने कॉलेज कडे निघाला. त्यातच त्याचा अपघात झाला. हेल्मेट असल्याकारणाने तो बचावला गेला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. जो उपचाराने महिन्याभरातच व्यवस्थित झाला. ज्या वेळेस रुग्णालयात त्याचा उपचार चालू होता, त्यावेळी तो गणेशाला दोष देऊ लागला की, " हे गणेशा मी रोज तुझी भक्ती करतो आज सकाळी तुझी पूजा करूनच निघालो होतो, तरीही माझ्या समोर हे संकट उभे राहिले, तू यातून मला का वाचवले नाहीस? ".
ज्या वेळेस त्याचे उपचार पूर्ण झाले, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला बोलावून घेतले आणि हेल्मेट मुळे तुम्ही बचावले गेला असे सांगितले. त्यावेळी त्याला जाणीव झाली की आपण कधीच हेल्मेट वापरत नाही पण त्यादिवशी हेल्मेट वापरण्याची जाणीव आपल्याला कशी काय झाली? कोणी करून दिली? त्याच्या मनाने, असे मन जे गणेशा च्या नामस्मरणात डुंबून होते. त्यावेळी त्याला कळून चुकले की आपल्याला या संकटातून वाचवणारा आपला श्री गणेश आहे. त्यावेळी त्याने मनोमन श्री गणेशा चे आभार मानले.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
- अर्थ
इथे श्री रामदास स्वामी या श्लोका मधून आपल्या मनाला माझा श्रीराम कसा आहे हे समजावून सांगताना दिसतात. चक्रवाक हा एक पक्षी आहे. पक्षी दिवसभर फिरून आल्यानंतर सायंकाळ झाली की घरट्यामध्ये येतात. आणि पहाटेची प्रतीक्षा करतात. मार्तंड म्हणजे सूर्य. हे पक्षी अंधार सोडून सूर्याची वाट पाहत असताना दिसतात. पहाट झाली की घरटे सोडून आकाशात भरारी मारतात.
येथे श्री रामदास स्वामींना म्हणायचे आहे की ज्या प्रमाणे चक्रवाक पक्षाला सूर्य पहाट घेऊन येतो अगदी त्याच प्रमाणे प्रभू श्रीराम आपल्या भक्तांना संकटातून सोडवून घेण्यासाठी धावून येतात. अशा या प्रभु श्रीरामांची भक्ती केली तर तिचा प्रभाव आपल्या संपूर्ण जीवनावर दिसून येतो.
त्यामुळे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे मना तू प्रभु श्रीरामांची भक्ती कर ते कधीच आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाहीत.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Manache shok 170
ReplyDelete